नागपूर - उपराजधानी नागपुरात २१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजार ४७३ इतका झाला आहे. मात्र, नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८० टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा आकडा हजाराच्या पुढे गेला आहे. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
नागपुरात आतापर्यंत २२ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन रुग्ण हे जिल्ह्यातील आहेत तर ८ रुग्ण हे जिल्हा बाहेरील आहेत. सध्या नागपुरात कोरोना रुग्ण डिस्चार्ज होण्याची टक्केवारी ७७ टक्के इतकी झाली आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.५७ टक्के आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणार आहे.
सोमवारी दिवसभरात ३४ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार १७१ इतकी झाली आहे. नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडा ५२ वर गेला आहे. सध्या नागपुरात २७७ अॅक्टिव्ह रुग्णांवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय, एम्स आणि कामठीच्या मिलिटरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढही होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. अनलॉक-१ प्रमाणेच अनलॉक-२ मध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.