नागपूर : येथील एका हाय प्रोफाईल महिला हत्या प्रकरणात नागपूर पोलीस जबलपूरमधील काँग्रेस आमदार संजय शर्मांची चौकशी करत आहेत. आमदार संजय शर्मा पोलीस चौकशीसाठी नागपुरात दाखल झालेत. पीडितेची आई आणि आमदार संजय शर्मा यांना समोरासमोर बसून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. महिलेची हत्या झाल्यानंतर प्रमुख आरोपीला मदत केल्याचा आरोप संजय शर्मांवर आहे. दरम्यान चौकशीला जाण्यापूर्वी आमदार संजय शर्मा यांनी माध्यामांशी बोलताना सर्व आरोप फेटाळले.आपण संबंधित महिला किंवा आरोपीला ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मारेकऱ्याने हत्येची कबुली दिल्यानंतरही मृतदेह का सापडला नाही, असा प्रश्न या महिलेच्या आईनं पोलिसांना विचारला.
जबलपूरचे काँग्रेस आमदार संजय शर्मा यांची नागपूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. महिलेच्या हत्या प्रकरणातील आरोपींना त्यांनी मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर असून त्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे. चौकशी सुरू असताना नागपूर पोलिसांनी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराला देखील चौकशी सुरू असलेल्या ठिकाणी आणले आहे. आमदार आणि आरोपी यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांच्या तपासाबाबत संशय - मध्य प्रदेशच्या जबलपूरचे काँग्रेस आमदार संजय शर्मा यांची नागपूरच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात चौकशी सुरू असताना मृत महिलेची आई डीसीपी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. माझ्या मुलीला बेपत्ता होऊन 24 दिवस झाले असतानाही पोलीस तिला कसे काय शोधू शकत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. अद्याप पीडितेबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने पीडितेच्या आईने पोलिसांच्या तपासाबाबत संशय व्यक्त केला.
संशयितांची चौकशी सुरू : या हत्या प्रकरणाच्या तपासाला हवी तशी गती मिळालेली नाही. पोलिसांना अजूनही महिलेचा मृतदेह आणि मोबाईल मिळालेला नाही. त्यामुळे तपासाला कोणतीच दिशा मिळालेली नाही. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 आरोपींना आधीच अटक केलीय. पोलिसांनी आता संशयितांची चौकशी सुरू केलीय. त्याकरिता नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील जबलपूरचे काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना बोलावले आहे. शर्मा यांना चौकशीसाठी बुधवारी बोलवले होते. परंतु ते 23 ऐवजी 24 ऑगस्टला नागपुरात आले. आज नागपूर पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं संजय शर्मा यांनी म्हटलयं.
पोलिसांना मृतदेह मिळेना : या महिलेची हत्या केल्याची कबुली प्रमुख आरोपीने दिली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह हिरण नदीत फेकून दिला. याची कबुली पोलिसांना दिलीय. यानंतर नागपूर आणि जबलपूर पोलिसांनी हिरण नदीत मृतदेहाचा शोध घेतला. परंतु पोलिसांना मृतदेह मिळाला नाही.
हनी ट्रॅप म्हणून वापर : या हत्येप्रकरणात नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. मृत महिलेचा हनी ट्रॅपमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. या महिलेच्या पतीनेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील अनेक पुरुषांना टार्गेट केलं. त्यांना ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये कमावले, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला 1 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. जबलपूरला गेल्यानंतर दोन दिवसांनंतरही त्यांच्यासोबत संपर्क न झाल्याने या महिलेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा-