नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते असल्याचं स्पष्ट केल्यानं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडलेली नसून अजित पवार आमचेच नेते असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केल्यानं महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या आहेत. याबाबत काँग्रेस पक्षानं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काय काढायचा? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपावर देखील टीका केली आहे.
भाजपानं देशातील राजकारण सडवलं : काँग्रेस पक्षानं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ काढाला पाहिजे, असंही ते म्हणाले. शरद पवार महाविकास आघाडीसोबत आहेत. भारतीय जनता पक्षानं देशाचं, राज्याचं राजकारण सडवलं आहे. भाजापनेचं जनतेचा विश्वासघात केलेला आहे. वेळप्रसंगी जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. महाविकास आघाडी म्हणून शरद पवार आमच्या सोबत आहेत, असंही त्यांनी यावेळी ठणकावलं.
पक्ष फुटला नसल्याचं जाहीरपणे सांगावं : शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय हे सांगता येणार नाही. उद्या त्यांच्या पक्षाच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगात जाईल, कोर्टात जाईल. त्यामुळे तो त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही, असं त्यांनी जाहीररित्या सांगावं, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
आम्हाला घाबरण्याचं कारण नाही : शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं काँग्रेसला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आमच्यासोबत अनेक आघाड्या आहेत. 'इंडिया' आघाडीच्या पाठीमागे आता जनता उभी आहे. या सरकारची लोकप्रियता संपली आहे. हे सरकार ईडी, सीबीआयच्या जोरावर चालणारं सरकार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -