नागपूर - रामटेक मतदारसंघात शिवसेना भाजप युतीने कृपाल तुमाने यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण, काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे मतदारात संभ्रमाचे वातावरण आहे. नितीन राऊत आणि किशोर गजभिये यांची नावे चर्चेत आहेत. पण, अजून कुठल्याच नावावर शिक्कामोर्तब झाले नाही.
रामटेक मतदारसंघ काँग्रेसच्या दृष्टीने नेहमीच मजबूत मतदारसंघ राहिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिकांसारखे नेते या मतदारसंघातून समोर आले आहेत. देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण, अशा मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळत नाही. यामुळे काँग्रेस समर्थकात संभ्रम निर्माण झाला आहे.
उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तरी देखील काँग्रेस उमेदवार ठरवू शकली नाही. ११ एप्रिलला लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. रामटेकचे मतदान पहिल्याच टप्प्यात होणार आहे. त्यामुळे येथील उमेदवारी घोषित करणे महत्वाचे होते. पण, काँग्रेस हे करु शकली नाही. काँग्रेसच्या अंतर्गत असलेली गटबाजी याला कारणीभू असल्याचे बोलले जात आहे.