नागपूर : नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु झाली आहे. यासाठी नागरिकांच्या सूचना आणि नवनवीन संकल्पनांची साथ घेण्याचा विचार आयुक्तांचा आहे. राधाकृष्णन यांनी सांगितले की, लवकरच मनपाचा अर्थसंकल्प नागरिकांसमोर येणार आहे. शहरात राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या क्षेत्रात कोणत्या कामाची आवश्यकता आहे. याशिवाय विकासकामांची सर्वाधिक गरज आहे, याची माहिती या नवीन संकल्पनेच्या माध्यमातून प्रशासनाला होईल. त्या अनुषंगाने यावर निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
१० दिवसात सूचना पाठवा : मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे यांनी सांगितले की, नागपुरातील नागरिकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांना खालीलप्रमाणे सूचना किंवा संकल्पना मनपा तर्फे मागविण्यात येत आहे. नागरिकांनी सर्व सूचना १० दिवसाच्या आत मनपाकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून संकल्पना आणि सूचना मागवल्याने हे महापालिकेचे कौतुकास्पद पाऊल समजले जात आहे, नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
शहरात कोणत्या सुविधा असाव्यात : नागरिकांनी आपल्या प्रभागात भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्यांच्या निराकरणासाठी यावेळी अर्थसंकल्पात तरतूद करणे आवश्यक आहे. सदर समस्या कुणाची वैयक्तिक नसून व्यापक स्वरूपात असावी, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये शहर सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येऊ शकणाऱ्या विविध उपाययोजना, नागरिकांना मूलभूत सोई सुविधा प्रदान करणारी, उदाहरणार्थ- रस्ते, पाणी, स्वच्छता, परिवहन यासाठी आपल्या सूचना, नागपूरला राज्यातील क्रमांक एकचे शहर करण्यासाठी सूचना, जबाबदार नागरिक आणि संवेदनशील प्रशासन या दृष्टीकोनातून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लागू करता येणाऱ्या उपाययोजना, उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून आपल्या सूचना, मनपाच्या उत्पन्नाचे मर्यादित स्रोत पाहून नागरिकांनी आपल्या सूचना द्याव्या, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यावर्षी अर्थसंकल्पातून नागपूरला काय मिळेल : नागपूर महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपल्यामुळे आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही सुरू न शकल्याने निवडणूक झाल्या नाहीत. त्यामुळे यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासक राधाकृष्णन बी. अर्थसंकल्प सादर करतील. नागपूर महापालिकेचा 2022 -23 या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी सादर केला होता. 2 हजार 669 कोटींच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात नागपूरकरांवर कराचा कोणताही नवा बोजा लादण्यात आलेला नव्हता. यावर्षी अर्थसंकल्पातून नागपूरला काय मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.