नागपूर- बार लूट प्रकरणातील विधी संघर्ष आरोपींची अर्धनग्न धिंड काढल्याचे प्रकरण नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त स्तरावरील अधिकारी मार्फत चौकशी करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह ७ पोलीस दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, असे एकूण ७ जणांवर जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हा संपूर्ण घटनाक्रम २२ सप्टेंबर रोजी घडला होता. २१ सप्टेंबरच्या रात्री जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॉयल बार आणि रेस्टॉरंटमध्ये सात आरोपींनी चाकू, तलवारी आणि धारदार शास्त्रांचा धाक दाखवून बारच्या काउंटरमधील रक्कम लुटली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या आरोपींची दहशत संपवण्याच्या उद्देशाने सर्व आरोपींची अर्धनग्न धिंड काढली होती. महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षीसुद्धा नागपूर शहर गुन्हेशाखेने कुख्यात गुंड संतोष आंबेकरची अशीच धिंड काढली होती. त्यावेळी, कोणतीही कारवाई झाली नसल्याने तशाच प्रकारची हिम्मत जरीपटका पोलिसांनी करून बघितली. मात्र, हा प्रयोग त्यांच्या अंगलट आला आहे.
पोलिसांनी ज्या आरोपींची धिंड काढली होती, ते विधी संघर्ष आरोपी होते. शिवाय, अर्धनग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर काहींनी या संदर्भात आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त परशूराम कार्यकर्ते यांनी संपूर्ण घटनेची चौकशी केली असता, यामध्ये बाल न्याय अधिनियमानुसार जरीपटक्याचे ठाणेदार तिजारे, सहाय्यक निरीक्षक धुमाळ यांच्यासह सात पोलीस दोषी असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यानंतर, आता जरीपटका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, असे एकूण सात जणांवर जरीपटका ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा- मी 'तसं' बोललोच नाही, संभाजीराजेंच्या दाव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया