नागपूर - कोरोनाची संख्या आता पुन्हा वाढू नये याकरिता महापालिका क्षेत्रात रात्रीचा कर्फ्यु लावण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता रात्री नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा शहराच्या अनेक भागात तैनात केला आहे. शहरात नाईट कर्फ्युची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही, हे तपासण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे देखील रस्त्यावर उतरले होते.
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वॉर्नरसोबत 'हा' खेळाडू संघातून बाहेर!
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लावण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीसाठी नागपूर पोलीस सज्ज झाले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वात तब्बल दोन हजार पोलिसांचा ताफा काल रात्रीपासून शहरात तैनात करण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकात नाकेबंदी करण्यात येऊन संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. याशिवाय शहरातील आठ नाक्यावरही विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. या पथकात पोलिस अधिकाऱ्यांसह पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरात येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध घालण्यात आला असून जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारी सज्ज -
राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी दंगल नियंत्रण पथक कृतीपथकही सज्ज ठेवण्यात आली आहे वेळ पडल्यास या पथकाची जवानांनाही आवश्यक त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. रात्र कालीन संचारबंदी दरम्यान वाहतूक शाखेतील अधिकार्यांसह सुमारे ३५० पोलिस कर्मचारीही शहरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.