नागपूर - कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील आदासा येथे कोळसा खाणीच्या ऑनलाईन शुभारंभादरम्यान ते बोलत होते. संपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये आपल्या देशाचा चौथा क्रमांक लागतो. मात्र, तरीदेखील आपणास कोळशाची बाहेरून आयात करावी लागते. कोळशाचे वीजनिर्मितीतील महत्व अनन्यसाधारण आहे. आपण दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली तर वीजनिर्मितीचा प्रश्नही मिटेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाला परवडणाऱ्या दरात अखंडित वीज पुरवठा करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या वतीने महाराष्ट्रातील नागपूरजवळील आदासा याठिकाणी एक आणि मध्यप्रदेशातील दोन कोळसा खाणींचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी ऑनलाइन उपस्थित होते, तर राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाणे, आमदार ॲङ. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, डब्ल्यूसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजू रंजन मिश्रा इतर लोकप्रतिनिधी तसेच वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक कळ दाबून ऑनलाईन पद्धतीने या खाणीच्या कामाचा शुभारंभ केला. आदासा खाणीत 334 कोटी रुपये गुंतवणूक केली जात असून 1.5 दशलक्ष टन कोळसा उत्पादन होणार आहे. 550 जणांना रोजगार मिळणार आहे. कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचतो, श्वसन व इतर आजार उद्भवतात.
कोळशातील राखेचे प्रमाण कमी करण्यासाठी कोळसा धुण्याची ( कॉल वॉश) प्रक्रिया योग्य प्रकारे झाल्यास प्रमाण खूप कमी होऊ शकते. येणाऱ्या 4 वर्षांत महाराष्ट्रात 14 खाणी सुरू होत आहेत आणि त्यातील 3 याच वर्षी सुरू करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे 11 हजार 500 कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे 13 हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती यावेळी वेस्टर्न कोलफिल्डने दिली.