नागपूर - भाजपला मेहबुबा मुफ्ती सोबतची युती चालते. 'भारत जलाओ पार्टी' म्हणणारे रामविलास पासवान चालतात. त्यामुळे तुम्ही आम्हाला सावरकर शिकवू नका. आम्हाला सावरकर शिकवायला निघाले. मात्र, सावरकरांबाबत ट्विट करणारा कोणी द्रष्टा तर नाही ना? याचा शोध घ्या, असे खडेबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. आज विधानसभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधानसभेतील संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथं क्लिक करा...
भाजपला खरच सावरकर समजले आहेत. गोवंश हत्याबंदीचा कायदा सर्वत्र लागू का झाला नाही. माझ्या महाराष्ट्रात ती माता आणि बाहेर जाऊन खाता, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. तसेच मी गोमांस खाणार, असे किरण रिजजू म्हणतात. तसेच गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकरांनी देखील गोमांस कमी पडू देणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे तुम्ही आम्हाला हिंदुत्व आणि सावरकर शिकवू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राजकारण जुगार आहे. धर्म आणि राजकारण एकत्र करायला लागलो होतो. मात्र, त्याचे फटके आम्हाला बसले. आताही आमचे धर्मांतर नाही झाले. कालही हिंदू होतो. आजही हिंदू आहोत आणि उद्याही राहू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सीमाप्रश्न कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केला पाहिजे -
केंद्र सरकार गेली ५ वर्ष कर्नाटक धार्जींनी भूमिका घेत आहे. सीमावासियांवर होणारे भाषिक अत्याचार कधी संपणार. केंद्रात आणि कर्नाटकात भाजप सरकार आहे. आता सीमाप्रश्न कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केला पाहिजे. देशातील हिंदुंना न्याय देणार नसाल, तर परदेशातील हिंदुंचा पुळका कशाला?, असे म्हणत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपवर निशाणा साधला.