नागपूर - संत्रा नगरीला शैक्षणिक हब म्हणून विकसित करताना देशातील सर्व प्रतिष्ठित शैक्षणीक संस्था नागपुरात आणण्यात यश आले याचे समाधान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भविष्यात नागपुरातील सिम्बॉयसीसच्या लॉ (विधी) विद्यापीठात एखादे लेक्चर घेण्याची इच्छा असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.
आज नागपूरच्या वाटोडा परिसरात सिम्बॉयसीस आंतरराष्ट्रीय विद्यपीठाच्या नागपूर येथील वास्तूचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा एक डिग्री घेण्याचा विचार करत असतील, त्यांच्याकडे सर्वाधिक पदव्या आहेत. पण, सिम्बॉयसीस विद्यापीठाची वास्तू बघून त्यांना पुन्हा नव्याने प्रवेश घेण्याचा मोह आवरता येत नसेलच. मला एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार नसला तरी भविष्यात निवडणुका आटोपल्यानंतर नागपुरातील सिम्बॉयसीसच्या लॉ (विधी) विद्यापीठात एखादे लेक्चर घेण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.