नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी करण्यात आली होती. या काळात सर्व काही ठप्प झाले असताना नागपूर महापालिकेने टाळेबंदीचा योग्य उपयोग करत शहरातील नाल्यांची सफाई करून घेतली आहे. शहरातील ५८२ किलोमीटर नाल्यांपैकी ५३७ किलोमीटरच्या नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा महानगर पालिकेने केला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशांनुसार ही कामे करण्यात आली आहेत.
पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होऊ नये, त्याचा सहजतेने निचरा व्हावा, यासाठी आयुक्त मुंढे यांच्या निर्देशांनुसार पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणात नाले सफाई सुरू आहे. हे काम पावसाळ्याआधी एप्रिल महिन्यातच हाती घेण्यात आले. त्यानुसार, दहाही झोनमधील रस्त्यांलगत ५८२.८४ किलोमीटरपैकी आतापर्यंत ५३७.१७ किलोमीटर पावसाळी नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित ४५.६७ किलोमीटरची सफाई सुरू असून येत्या काही दिवसात ती पूर्ण होणार आहे.
शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांच्या बाजूला, फुटपाथलगत असलेले नाले बुजलेल्या स्थितीत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. लॉकडाउनमुळे फुटपाथ आणि रस्तेही मोकळे असल्याने स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरले. विशेष म्हणजे, पावसाळी नाल्यांच्या सफाईसाठी मनपाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागला नाही. मनपाच्या स्वच्छता कर्मचारी व ऐवजदारांमार्फत दहाही झोनमध्ये हे कार्य सुरू आहे. या स्वच्छता कार्यांतर्गत आरसीसी बॉक्स ड्रेन व आरसीसी पाईप ड्रेनची संपूर्ण सफाई मनुष्यबळाद्वारे केली जात आहे. यामधून माती आणि इतर कचरा काढून ते पावसाळ्याच्या पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा, यासाठी नाले मोकळे करण्याचे काम सुरू आहे.