नागपूर: अनुपम खेर यांनी नितीन गडकरी यांना कुटुंब, चित्रपट, मैत्री, राजकारण आदी विषयांवरील अनेक प्रश्न विचारले. यावेळी नितीन गडकरी यांनी संघर्षमय दिवसांच्या त्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘नाटक मागून आणि सिनेमा समोरून बघणाऱ्या पोरांपैकी मी होतो. अभ्यासात कधीच चांगला नव्हतो. ते दिवस संघर्षाचे होते, पण आजच्यापेक्षा चांगले होते, असे गडकरी म्हणाले.
मैं तो चला जिधर चले रास्ता: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेत काम करताना समाजातील गोर-गरीब, शोषित पीडित व उपेक्षितांच्या कल्याणासाठी काही तरी करायला हवे, असे संस्कार माझ्यावर झाले. त्यानुसार काम सुरू केले आणि त्यानंतर ‘मैं तो चला जिधर चले रास्ता. मुझे क्या खबर है कहा मेरी मंजिल’ असे माझे आयुष्य पुढे जात राहिले, असे गडकरींनी सांगितले.
मी कधी लोकप्रियतेचा विचार करत नाही: नितीन गडकरी यांच्या कामांचा, त्यांच्या निर्णय तत्परतेचा आणि कल्पक बुद्धीचे आपण चाहते असल्याचे अनुपम खेर म्हणाले आणि आपल्या लोकप्रियतेचे रहस्य काय आहे, असा प्रश्न त्यांना केला. त्यावर ते म्हणाले, ‘मी कधी लोकप्रियतेचा फार विचार केला नाही आणि करत नाही. माझ्याबद्दल लोक काय बोलतात, याचीही फार चिंता करत नाही. नागपूर माझा परिवार आहे. इथे विरोधकही माझ्याकडे येतात, हीच माझी खरी शक्ती आहे.’
ऍक्शन अन् डायलॉग: आपला आवडता नट कोणता आहे, असा प्रश्न विचारला असता नितीन गडकरी म्हणाले की, दारा सिंग यांचे फायटिंगचे सिनेमे मला खूप आवडायचे. अमिताभ बच्चन यांचे दिवार, जंजीर, आनंद हे चित्रपटही मला खूप आवडायचे आणि त्याचे डायलॉग्सही पाठ होते, असे गडकरी म्हणाले. त्यानंतर अनुपम खेर यांनी यावेळी गडकरींनी ‘जली को आग कहते है, बुझी को राख कहते है' हा शत्रुघ्न सिन्हा यांचा लोकप्रिय डायलॉग म्हटला. त्यावर उपस्थित तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटासह दाद दिली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.