नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केले. भाजपमध्ये महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार हे पक्षात प्रवेश करीत आहेत. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 2024 पर्यंत मोठे पक्षप्रवेशाचे बाॅम्ब ब्लास्ट होणार आहेत. आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचे काम करीत आहे. आमची विचारधारा ज्यांना आवडते, ते आमच्या पक्षात प्रवेश करतात. आम्ही कोणालाही पक्षात प्रेवश करण्याचे निमंत्रण देत नाही. परंतु आल्यास त्यांचे स्वागत आम्ही करू, असा सूचक इशारादेखील त्यांनी दिला.
आदित्य राष्ट्रीय नेत्या सारखे : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला कधी समर्थन करणार नाही. कोणाच्या ही ताफ्यावर दगडफेक करणे योग्य नाही. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. तसेच आदित्यजींनी राज्यपाल बदलाचे विधान केले होते त्यावर ते म्हणाले की, राज्यपाल बदलाचे अधिकार ना मला आहे ना आदित्य ठाकरेंना. केंद्रीय व्यवस्थेचा विषय आहे. आदित्य ठाकरे मोठे राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागत असल्याचा टोला त्यांनी लावला आहे.
संजय राऊतांना जोरदार टोला : संजय राऊत यांना दोन चष्मे आहेत. एका चष्म्यातून पाहिले तर त्यांना सर्व हिरवा रान दिसतं आणि दुसऱ्या चष्म्यातून त्यांना हिरव असलेले रानही कोरडा दुष्काळ दिसतो. संजय राऊत एका चष्म्यातून उद्धव ठाकरे, शरद पवार महाविकास आघाडी यांच्या उपक्रमांकडे पाहतात तर दुसऱ्या संदर्भात त्यांना कोरडा दुष्काळ दिसतो. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहे. त्यांची सभा मोठी झाली. खुर्च्या उचलाव्या लागल्या नाही. चांगले समर्थन एकनाथ शिंदे यांना मिळाले. संजय राऊतांच्या एका विधानावरही त्यांनी पलटवार देताना सांगितले, एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवारांच्या कार्यक्रमात मोदीही गेले आहेत. प्रफुल पटेल यांच्या कार्यक्रमात फडणवीस गेले आहेत आणि जाणारही आहेत. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहेत. सकाळचा नऊचा भोंगा बंद झाला तर ही संस्कृती नक्कीच जगता येईल.
जगातील सर्वात विद्वान तेच : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजच्या काळातील शाहू महाराज आहेत, असे वक्तव्य हरी नरके यांनी केलेलं आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बवनकुळे म्हणाले की, ते विद्वान आहेत, जगातील सर्वात विद्वान तेच आहेत पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले आहे. म्हणून ते सभेला नव्हते. काल मुंबईतील वरळी येथील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील येतील, अशी चर्चा होती. मात्र, काल अर्थसंकल्पासंदर्भात बैठका झाल्या. त्यामुळे कदाचित ते सभेला हजर राहू शकले नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
कोराडी मंदिराला निधी : कोराडी मंदिरात अनेक विकासकामे होत आहेत. कल्चरल सेंटर बांधलेले आहे. देशातील एकमेव कल्चर सेंटर, रामायण भवन बांधण्यात आले आहे. भाविकांना सुविधा मिळाव्यात, देशभरातील शक्तीपीठ तिथे उभारले जाणार आहे. भाविकांना तिथे शक्तिपीठांचे दर्शन होणार आहे. निधी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद.
२०२४ ला भाजपमध्ये मोठी इनकमिंग : भाजपमध्ये वेगवेगळे अभियान राबवतो आहे. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही काही संन्यासी नाहीत. आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्ष वाढवण्याचा काम करत आहोत. आम्ही कोणालाही ऑफर देणार नाही. आमच्या पक्षात या, असा निमंत्रण देणार नाही. मात्र भाजपमध्ये कोणीही आला तर त्यांचा स्वागत करू. त्यांच्या पक्षात जेवढं सन्मान आहे त्यापेक्षा जास्त सन्मान भाजपमध्ये देऊ. स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. येणाऱ्या काही दिवसात असे पक्षप्रवेश होत राहणार. 2024 मध्ये एवढे पक्षप्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवार भेटणार नाही. दहा तारखेला ठाण्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होणार आहेत.
हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न : बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीवर मी त्यांची भेट घेणं योग्य नाही. हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. बाळासाहेबांची नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हेही मला माहित नाही. मी त्यांना काल वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मात्र, त्यांचा फोन बंद होता. नाराजीचा कारण नाना पटोले यांनाच माहिती आहे. बाळासाहेब थोरात यांनी कधीच आम्हाला संपर्क केलेला नाही. आयुष्याची चाळीस वर्षे त्यांनी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतली आहे. या गोष्टीचा वाईट वाटते की, महाराष्ट्राच्या विधान मंडळात नऊ वेळा निवडून गेलेले ते नेते आहेत. सहकार क्षेत्रात मोठे काम केले आहेत आणि अशा नेत्याला पक्षात नाराज व्हावं लागते हे काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. भाजपमध्ये अशी नाराजी राहिली तर आम्ही लगेच दाखल घेतो.