नागपूर - मोदी आणि अमित शाह यांच्यावर गोध्रा प्रकरणात सहभागी असल्याचे गुन्हे नोंद आहेत. केंद्रातील मोदी सरकार पायउतार झाल्यानंतर गोध्रा प्रकरणातील पीडित पुढे येऊन मोदी शाह यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करतील, असे भाकित छगन भुजबळ यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अध्यक्ष अमित शाह यांची जस्टीस लोहिया आणि गोध्रा दंगली प्रकरणी चौकशी होणे शक्य असल्याचे वक्तव्य राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे, ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशातील सर्व तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे ते केवळ धमकावून तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, अशा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील गोंदिया येथे जाहीर सभेला संबोधित करताना तिहार तुरुंगात अटकेत असलेले काही आरोपी आपले नाव सांगतील म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना झोप येत नाही, असे वक्तव्य केले होते. यावर भुजबळ यांनी नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार हे आपले गुरू आहेत, असे सांगून मोदी केंद्राच्या राजकारणात आले होते. मात्र, तेच मोदी आता जाहीर भाषणातून शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. परंतु गुरु हा गुरु असतो, तो केव्हाही आपल्या शिष्यावर भारी पडेल, असे देखील भुजबळ म्हणाले. एवढेच नाही तर रिझर्व्ह बँकेत मोदी सरकारने अर्थशास्त्रज्ञ बसवण्याऐवजी इतिहास तज्ञ बसवला असल्याची टीका देखील त्यांनी केली.