नागपूर - भारतीय बाजारपेठांवर चीनचा अघोषित कब्जा आहे. मात्र, भारत आणि चीन मधील संबंध ताणले गेल्यापासून 'वोकल फॉर लोकल' या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळेच, आता भारतीय व्यापारी दिवाळीत चीनला मोठा दणका देण्याच्या तयारीत आहेत. दिवाळीत लागणाऱ्या वस्तूंची चीनमधून आयात करायची नाही, असा महत्वपूर्ण निर्णय कॅट, म्हणजेच कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (भारतीय व्यापारी महासंघ) घेतला आहे.
कॅटच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चीनला अंदाजे ४० हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. चीनच्या खुरापतींना भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत असल्यानेच आजपर्यंत चीन आपल्या विस्तारवादी योजनांमध्ये यशस्वी होऊ शकलेला नाही. सीमेवर आपले जवान कर्तव्य बजावत असताना देशातील नागरिकांनी देखील आपली जबाबदारी पूर्ण करायला हवी. म्हणूनच कॅटकडून 'बायकॉट चीन' ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय यांनी दिली.
सध्या उत्सवांचा काळ सुरू आहे. काही दिवसांवर दिवाळी आहे. दिवाळीतच सर्वाधिक चिनी वस्तूंची विक्री होत असल्याचा अंदाज असल्याने कॅटकडून जाहीर झालेल्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसून येणार आहे. तसेच, भारतीय लघु उद्योगांना यातून संजीवनी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कॅटने आखलेली योजना सत्यात उतरली, तर चीनला ४० हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. याकरिता कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने पुढाकार घेतला असून देशभरातील व्यापाऱ्यांना या संदर्भात माहिती पोहोचवण्याचे काम देखील सुरू झाले आहे.
हेही वाचा- येत्या एक महिन्यात बहुप्रतिक्षित 'डबल डेकर'पूल नागरिकांसाठी होणार खुला