नागपूर - नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला (सीएए) विरोध लोकशाही मार्गानेच करावा, असे आवाहन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज (शुक्रवारी) पाचवा दिवस आहे. यावेळी विधानभवन परिसरात गृहमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देशातील अनेक सामाजिक आणि गैरसामाजिक संघटना या कायद्याला विरोध दर्शवत आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मात्र, राज्यात अतिशय शांततेत आंदोलने केली जात आहेत. मुंबईतसुद्धा या संदर्भात मोठा मोर्चा निघाला आहे. मात्र, यात कुठेही हिंसाचाराच्या घटनेची माहिती नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची मोठी भूमिका असल्याने गृहमंत्री शिंदे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.
हेही वाचा - CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी
राणेंबद्दल शिंदे म्हणाले -
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर उद्धव ठाकरे यांना कधीही मुख्यमंत्री होता आले नसते, अशा आशयाचे वक्तव्य माजी शिवसैनिक राहिलेल्या नारायण राणे यांनी केले होते. त्यावर प्रत्यत्तर देताना शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईनेच नारायण मुख्यमंत्री झाल्याचे त्यांनी विसरू नये.
अजित पवारांचे प्रकरण न्यायप्रविष्ट -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पावर यांना अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) क्लीन चिट दिल्याच्या प्रकरणावर शिंदे म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यावर फार बोलता येणार नाही.