नागपूर - लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत असताना नागरिकांच्या सुविधेसाठी राज्यसरकारने आजपासून राज्यातील ग्रीन झोनसह अन्य शहरांसाठी अटी शर्तीसह सूट दिलेली आहे. त्यानुसार शहरातील काही उद्योग,आस्थापने सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लॉकडाऊन कालावधीत राज्य सरकारने सुचवलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधितांकडून संपूर्ण अटी व शर्तींचे पालन होत असेल तरच नागपूर महानगरपालिका त्या उद्योग आणि अस्थपनांना परवानगी देणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात उद्योग आणि आस्थपना संचालकांना महानगर पालिकेकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज करताना संबंधित आस्थापनेची कार्यप्रणाली कशी असेल, किती कर्मचारी उपस्थित राहतील, त्यांच्या बसण्याची व्यवस्था करताना सामाजिक अंतर पाळले जात आहे की नाही, सॅनिटायझेशनची काय व्यवस्था असेल आदींचा स्पष्ट उल्लेख अर्जात नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर उद्योग सुरू करताना कामाच्या ठिकाणांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाच्या परवानगीकरिता कर्मचाऱ्यांना ‘ट्रॅव्हल पास’ मनपा आयुक्तांकडून घ्यावी लागणार आहे.
अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी)
०१) उद्योग, आस्थापना व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्यासाठी परवानगी हवी आहे, त्यासाठी पुढीलप्रकारे मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) राहतील.
०२) संबंधित आस्थापनेच्या संपूर्ण क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे
०३) कर्मचाऱ्यांसाठी कंपनीतर्फे सामाजिक अंतर पाळून प्रवास व्यवस्था करणे
०४) थर्मल स्कॅनिंग करणे
०५) लिफ्टचा कमीत कमी वापर करणे
०६) गुटखा, तंबाखू आणि थुंकण्यावर निर्बंध
०७) कामाच्या दोन पाळ्यांमध्ये एक तासाचे अंतर असावे.
काही अटी शर्तींच्या आधारे मनपा आयुक्त परवानगी देण्यात येत असली तरी लॉकडाऊन ३ मे पर्यंत कायमच राहील, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. या काळात राज्य सरकारच्या सूचनांचे जे लोक उल्लंघन करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.