नागपूर- ब्राह्मण समाजातर्फे विविध मागण्यांसाठी शनिवारी राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील संविधान चौकात समाजातर्फे धरणे आंदोलन करत घंटानाद करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राह्मण समाज 7 टक्के आहे. समाजाची इतकी मोठी टक्केवारी असताना सुद्धा सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ब्राह्मण समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी समाजातर्फे २२ जानेवारी २०१९ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य आंदोलन केले होते.
ब्राह्मण समाजच्या प्रगतीसाठी सरकारने परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावे. या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.सरकारकडे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील काहीच उपयोग होत नसल्यानेच आज राज्याच्या अनेक जिल्ह्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले.