नागपूर Bomb Threat HC : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील दोन न्यायाधीशांना धमकी मिळाली आहे. मालमत्ता कर प्रकरणात प्रतिकूल निकाल दिल्यास या न्यायाधीशांवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देणारं पत्र न्यायालयाला प्राप्त झालं. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
काय आहे पत्रात : नागपूर खंडपीठाला ११ ऑक्टोबर रोजी हे पत्र प्राप्त झालं. या पत्रात, अमरावती जिल्ह्यातील वरुड नगर परिषदेनं मालमत्ता करात केलेल्या वाढीला आव्हान देणाऱ्या प्रभाकर काळे यांच्या याचिकेवर दोन न्यायाधीशांनी प्रतिकूल निर्णय दिल्यास त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात येईल, असं नमूद केलं होतं. हे पत्र काळे यांच्या नावानं पाठवण्यात आलं असून, न्यायालय प्रशासनानं तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली, अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.
कोणी पत्र पाठवलं : या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी याचिकाकर्त्याची चौकशी केली. मात्र त्यांनी हे धमकीचं पत्र लिहिण्यात आपला कोणताही सहभाग असल्याचं नाकारलं. काळे यांच्या वकिलांनीही त्यांच्या विधानाला दुजोरा दिला असून, हे पत्र काळे यांना बदनाम करण्यासाठी पाठवलं गेलं असावं, असं वकिलांचं म्हणणं आहे. पोलिसांनी हे पत्र कोणी पाठवलं याचा तपास सुरू केला आहे. पोलीस अधिक माहितीसाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
न्यायालयाभोवती सुरक्षा वाढवली : उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार रवींद्र सदरानी यांनी पत्र मिळाल्याची पुष्टी केली. धमकीचं हे पत्र मिळाल्यानंतर न्यायालयाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्या सोबतच धमकी मिळालेल्या दोन्ही न्यायाधीशांच्या निवासस्थानाभोवती सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा :
- Chhagan Bhujbal Threatening : मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; कारण काय?
- Sameer Wankhede Death Threat : समीर वानखेडे यांना बांगलादेशमधून जीवे मारण्याची धमकी, गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार
- Death Threats To Celebrities : 'या' सेलिब्रिटींना मिळाल्या आहेत धमक्या; जाणून घ्या, मुंबई पोलिसांचा Full Security प्लॅन