नागपूर: जिल्ह्यातील खापरखेडा येथील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीत काम सुरू असताना एअर स्टोनिंग ब्लास्ट झाला. हा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत ११ कामगार होरपळले. या जखमी ११ कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी कामगार हे कंत्राटी कामगार आहेत.
11 कामगार जखमी: सिल्लेवाडा कोळसा खाणीतून कोळसा बाहेर काढण्याचे काम सुरू असताना अचानक एअर स्टोनिंग ब्लास्ट झाला. यात 11 कामगार जखमी झाले. हा ब्लास्ट कोळसा खाणीच्या सीम-2 अंतर्गत असलेल्या सेक्शन 6मध्ये झाला आहे. मात्र,स्फोट होण्यामागे नेमकं कारण काय होते याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. या स्फोटामध्ये अनिल बोबडे,राजू मिस्री,अनिल सिंग,कुलदीप उईके,महिपाल,विलास मुडे, योगेश्वर यांच्यासह अन्य कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक: कोळसा खाणीच्या आत एअर स्टोनिंग ब्लास्ट झाल्याची माहिती समजताच खाण प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत 11 कामगार होरपळले आहेत. त्यातील दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. या कामगारांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप कोळसा खाण प्रबंधनाकडून कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या शिवाय जखमींसाठी देखील मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही.
स्कॅनिंगचे काम सुरू असताना स्फोट : सिल्लेवाडातील 6 क्रमांकांच्या सेक्शनमधील कोळसा खाण गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. दरम्यान या खाणीच्या देखभालीसाठी कामगार नियमित जातात. मंगळवारच्या सायंकाळी स्कॅनिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला होता. या स्फोटात दोन कामगार गंभीररित्या भाजले गेले. दरम्यान स्कॅनिंगच्या कामावर 10 ते 11 कामगार असल्याची माहिती मिळाली आहे. यातील दोन कामगारांची स्थिती गंभीर आहे. दरम्यान हे कंत्राटी कामगार आहेत. सिल्लेवाडा कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात सात कामगारांचा मृत्यू झाल्याची अफवा परिसरात पसरली होती. अफवेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते.
आधीही घडली होती घटना : अशीच घटना मागील काही वर्षापूर्वी घडलेली होती. दुर्घटनेने येथील वेकोलि कर्मचारी, कंत्राटी कामगारांचा सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेला जबाबदार कोण?, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा -