नागपूर - राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर पकडताना दिसत आहे. भाजपाने मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात भाजपाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्यातील बार सुरू होऊ शकतात तर मंदिरे का नाही ? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शनेही करण्यात आले. भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्त्वात साई मंदिरासमोर हे उपोषण करण्यात आले.
राज्य सरकारकडून अनलॉक 5अतंर्गत अनेक बाबींमध्ये शिथीलता देत अनेक ठिकाणे सुरू करण्यात आली. मात्र प्रार्थनास्थळे अजूनही बंदच आहे. शासनाकडून मंदिरे उघडण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली. मात्र महाराष्ट्रात त्यांची अद्यापही अमंलबजावणी का झाली नाही ? मंदिरे अजूनही बंदच का ? असा सवाल यावेळी करण्यात आला.
देशभरातील अनेक ठिकाणी मंदिरे सुरू झाली आहेत. मात्र महाराष्ट्र शासन मंदिराबाबत उदासीन आहे. असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कोरोनाच्या काळात लोकांना मानसिक धीर मिळण्यासाठी प्रार्थनास्थळांची गरज आहे. मात्र शासनाकडून लोकांच्या भक्तीला ठेच पोहोचवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच धर्मांची प्रार्थनास्थळे तात्काळ सुरू करा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, शासनाने मंदिरे व प्रार्थनास्थळे तात्काळ सुरू न केल्यास संपूर्ण जिल्ह्यातील प्रार्थना स्थळांसमोर भाजपाकडून आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशार बावनकुळे यांनी दिला.