नागपूर - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी राज्य सरकारचे आहे, एवढेच नाही तर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळू नये या कटातील झारीचे शुक्राचार्य हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. सोमवारी (दि. 13 सप्टेंबर) राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका कार्यक्रम जाहीर केल्यानंतर बावनकुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला असल्याने बुधवारी राज्यभरात एक हजार ठिकाणी तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार मधील राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची कोंडी केली जात असल्याचेही ते म्हणाले आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. सरकारला सर्व पक्षांची मदत असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने आरक्षण टिकवण्यासाठी काय करावे याबद्दल सूचना केल्यानंतर ही सरकारने ओबीसी समाजाला धोका दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील सर्वच नेते ओबीसी आरक्षणा शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असे म्हणत असताना ओबीसी समाजाला सरकारचे आश्वासन सत्य वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी ओबीसी समाजासोबत दगाबाजी केली असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
नाना पटोले यांनी सत्य मान्य केले - बावनकुळे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधी व न्याय विभागाची जबाबदारी आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल ते गंभीर नसून केवळ देखावा करण्यासाठी वांझोट्या बैठका घेतल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. सरकारने चार महिन्यांपासून या संदर्भात काहीच कृती केली नाही म्हणून अॅडव्होकेट जनरल न्यायालयात बाजू मांडू शकले नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात अॅडव्होकेट जनरल आणि ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर खापर फोडण्याचे काम महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलनाची घोषणा
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड पडलेला आहे. एकीकडे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, अशी घोषणा करायची आणि दुसरीकडे निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असा खेळ राज्य सरकारकडून खेळला जात आहे. म्हणून या विरोधात बुधवारी राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
हेही वाचा - ओबीसी समाज निवडणुकीत राज्य सरकारला सोडणार नाही - बावनकुळे