नागपूर- सिल्लेवाडा गावात प्रवासी वाहतूक बस सेवेचे उद्घाटन कार्यक्रम पार पडला होता. दरम्यान कार्यक्रमाचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आमदार सुनिल केदार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. मात्र, हा वाद निवळला नाही. उलट केदार यांना उत्तर देण्यासाठी भाजपने आज सिल्लेवाडा गावात घरोघरी भाजपचे झेंडे लावण्याचे आंदोलन केले.
सिल्लेवाडा गावात गुरुवारी प्रवासी वाहतूक बस सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे कार्यक्रमाचे श्रेय घेण्यावरून आमदार सुनिल केदार व भाजप कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. भाजपचे झेंडे कुणाच्या घरावर दिसल्यास त्याला मारण्याची धमकी आमदार सुनिल केदार यांनी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. तेव्हा केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना उघड धमकी दिल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
हेही वाचा- नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला सीएनजी बसमधून प्रवास
या घटनेनंतर केदार यांच्याविरुद्ध आक्रमक झालेल्या भाजपने आज सिल्लेवाडा गावात अभिनव आंदोलन केले. यावेळी भाजपच्या वतीने गावातील अनेक घरांवर भाजपचा झेंडा लावण्यात आला. या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.