नागपूर: आरोपी निरजसिंह राठोड याने भाजपच्या सहा आमदारांना फोन केले होते. यामध्ये नागपूरचे आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांचा समावेश आहे. या सर्व लोकांना त्याने अगोदर बडोदा येथे संघाचा कार्यक्रम असून येथील जेवणाच्या व्यवस्थेसाठी पैशांची मागणी केली. आमदार नारायण कुचे यांनी त्याला दोन लाख 35 हजार रुपये दिल्याची माहिती आहे. तर इतर आमदार त्याच प्रक्रियेत असल्याचे देखील होते. त्याने आमदारांना क्यूआर कोड देखील पाठवला होता. मात्र आमदार विकास कुंभारे यांना संशय आल्याने, त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला यामुळे राठोडचे बिंग फुटले.
आणखी किती आमदारांशी संपर्क?: गुन्हे शाखेचे पथक तीन ते चार दिवसांपासून त्याच्या मागावर होते, अखेर नीरज राठोड त्यांच्या हाती लागला. त्याने आणखी किती आमदारांशी संपर्क साधला. त्याच्यासोबत आणखी कोण कोण आहे हे चौकशीत स्पष्ट होणार आहे. इतर ठकबाजांशी देखील निरज राठोडची काही लिंक आहे का याचा देखील शोध घेण्यात येत आहे. निरज ज्या पद्धतीने आमदारांशी बोलला त्यावरून त्याचा भाजप व संघाच्या कार्यपद्धतीचा चांगला अभ्यास असल्याचे दिसून येत आहे. तो भाजपचा कार्यकर्ता आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये फसवणुकीचे गुन्हे आहेत का? याचा देखील शोध घेण्यात येत आहे.
नड्डाचा आवाज काढात केली फसवणूक: आरोपीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह सहायक असल्याची बतावणी करत, भाजपचे आमदार विकास कुंभारे यांच्यासह अनेकांना गंडविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, आरोपीने एकदा जे.पी नड्डा यांचा आवाज काढत आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे.
अशी केली फसवणूक : विकास कुंभारे यांना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नीरज सिंह राठोड याचा फोन आला, त्याने जे पी नड्डा यांचे सहायक असल्याचे सांगत एका कार्यक्रमासाठी सहकार्य हवे आहे असे म्हटले. त्यानंतर तुमचे नाव मंत्रिपदासाठी सुरू असून तुम्हाला मोठे जबाबदारी देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्याने सुरुवातीला एक लाख 66 हजार व नंतर आणखी लागले तर पैसे देण्यासाठी तयार राहा असे सांगितले. त्यानंतर त्याने तीन ते चार वेळा आमदार कुंभारे यांना फोन केला. मात्र राज्यात कधी मंत्रीपदाबाबत विचारणा झाली नसताना अचानक दिल्लीहून अशी विचारणा होते व पैसे मागितले जात असल्याने, कुंभारे यांना संशय आला. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्या केल्यावर असे काहीच नसल्याचे स्पष्ट झाले.
पैसे तयार ठेवा गुड न्यूज मिळेल: आमदार विकास कुंभारे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. त्यानंतर तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नीरज सिंह राठोडला गुजरात मध्ये जाऊन अटक केली. त्याला आज नागपुरात आणण्यात आले. नीरज राठोडने आमदार कुंभारे व आमदार टेकचंद सावरकर या दोन नागपूरच्या भाजप आमदारांना फोन करून मंत्रिपदाच्या बदल्यात पक्षनिधीसाठी पैसे द्यावे लागतील असे म्हटले. त्याने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चक्क एक लिंक देखील पाठवली होती. बडोदा येथे संघाच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था केली तर गुड न्यूज मिळेल असे देखील त्याने सांगितले होते.
कॉल रेकॉर्डिंग वायरल: भारतीय जनता पक्षाच्या चार आमदारांना एका भामट्याने आवडत्या मंत्रिपदाचे गाजर दाखवत, लाखो रुपये उकळल्याचा खुलासा झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. पैसे द्या तुम्हाला मंत्रिपद मिळेल अशी बतावणी त्या भामट्याने केली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे सहायक असल्याचे सांगून पैसे उकळले आहेत.आरोपीने आमदार विकास कुंभारे यांना आरोपीने अनेकदा फोनवरून संपर्क साधला. त्या फोन कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली आहे. ज्यात आरोपीने मंत्रिपदाच्या बदल्यात गुजरात येथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गासाठी पैसे मागितले तर कधी कर्नाटक निवडणूकीत जोड-तोड करण्यासाठी पैसे लागतील त्यासाठी तैयार राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
हेही वाचा -