नागपूर - जिल्ह्याच्या विकासासाठी येणारा निधी कमी करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. भाजपच्या काळात हा निधी शंभर टक्के वाढवला होता. मात्र, यंदा सर्व योजनांमध्ये मिळणाऱ्या निधीमध्ये कात्री लावली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला फटका बसला आहे, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
उपराजधानी म्हणून विशेष निधी नाही. म्हणून जिल्हा नियोजन समितीचा निधी कमी करू नये. गेल्या वर्षीच्या 750 कोटी वरून 800 कोटी निधी करावा आणि निधीमध्ये दरवर्षी 100 कोटी वाढवून द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
आमच्या सरकारने कुठल्याही जिल्ह्याचा निधी कमी करून नागपुरातील निधी वाढवलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
ग्रामपंचायतीच्या अध्यक्षाची निवड थेट करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. यामध्ये ग्रामीण जनतेचा विचार केला नाही. फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला होता. म्हणून त्यात बदल करण्यात आला. या निर्णयावर फेरविचार करावा, असेही बावनकुळे म्हणाले. अन्यथा सोमवारी भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.