नागपूर - नव्या अर्थसंकल्पात जिल्ह्यांना विकास निधी वाटप करताना सरकारने पुणे आणि सांगली सारख्या जिल्ह्यांचा निधी वाढवला आहे. मात्र, पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांच्या विकास निधीला मोठी कात्री लावली असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्याला विकासनिधी म्हणून 525 कोटी रुपये देण्यात आले होते, तर या सरकारने त्याला 125 कोटी रुपयांची कात्री लावून हा विकास निधी 400 कोटी रुपये केला असल्याचे बावनकुळे म्हणाले.
पूर्व विदर्भाच्या इतर जिल्ह्यात सुद्धा निधी कमी करण्यात आला आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्याचा निधी वाढविला यावर आमचा आक्षेप नाही. मात्र, पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांचा निधी का कमी केला? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. गेल्या वर्षी वर्धा शहराला 190 कोटी रुपये विकास निधी म्हणून प्राप्त झाले होते, तर यावर्षी या निधीत 27 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. याशिवाय भंडारा जिल्ह्याला 160 कोटी मिळाले होते, यावर्षी मात्र 129 कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत. गोंदियाच्या विकास निधीत सुद्धा 10 कोटी रुपये कमी करण्यात आले आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या विकास निधीत सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी चंद्रपूरला 375 कोटी रुपये मिळाले होते. मात्र, यावर्षी या निधीत 127 कोटींची कपात करण्यात आली असून यावर्षी 248 कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास निधी कमी करण्यात आला आहे. गडचिरोलीच्या विकास निधीला 30 कोटी रुपयांची कात्री लावली आहे. त्यामुळे सरकारने पूर्ण विदर्भावर अन्याय केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.