नागपूर : कोरोनाच्या काळातील पाणी दरवाढ रद्द करा. या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनासमोर आंदोलन केले. शिवाय मुंढेच्या विरोधात फलक दाखत निषेधही व्यक्त करण्यात आला. कोरोनाचे संकट असतांना पाणी दरवाढ केल्या जात आहे. त्यामुळे ही दरवाढ सामान्य जनतेला कशी परवडणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
कोरोनाच्या काळातही महारानगरपालिकेकडून पाणी दरवाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ही पाणी दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी भाजप नगरसेवक यांच्यावतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले. एकीकडे कोरोनाचे संकट असताना मनपा आयुक्तांनी ५ टक्के पाणी दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला अधिकच संकटात टाकले आहे. आधीच सामान्य माणूस आर्थिक संकटात आहे. अशावेळी शहरातील पाणी दरवाढ ही सर्वसामान्यांनी कशी भरावी असा सवाल भाजप नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे ही पाणी दरवाढ तत्काळ रद्द करा अशी मागणीही या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
शिवाय भाजपच्या सर्व नगरसेवकांनी फलक घेत आयुक्त तुकाराम मुंढेचा निषेध नोंदवला. त्याचबरोबर ही दरवाढ किमान यावर्षी तरी थांबवावी. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवाय महारानगरपालिकेच्या नियमांचे आम्ही विरोध करत नाही. कारण सभागृहामध्ये निर्णय सर्वमतानेच होतो. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यासाठी सर्व नगरसेवक एकत्र आले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिली. कोरोनाचा हा काळ प्रत्येकावरच आलेलं संकट आहे. जिथे सामान्य व झोपडपट्टीत राहणाऱ्यांना या काळात दोन वेळेच्या जेवणाचे प्रश्न पडले आहेत, तिथे पाणी दरवाढ कुठून भरणार, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला. त्यामुळे हा पाणी दरवाढीचा निर्णय तत्काळ रद्द करा, अशी मागणीही यावेळी भाजप नगरसेकांकडून करण्यात आली.