मुंबई : मुंबईत गेल्या २५ वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांना त्यांच्या कार्यकाळात काही करता आले नाही. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर गेल्या सात महिन्यात मुंबईचा कायापालट होत आहे. अनेकांनी मुंबईला शांघाय करू असे म्हटले आहे. आम्हाला मुंबई शांघाय नाही तर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबई करायची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
खड्डा शोधायला बक्षीस : मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत अतिरिक्त ३२० प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राहुल शेवाळे, पुनम महाजन, आमदार मंगेश कुडाळकर, प्रसाद लाड, राजहंस सिंग, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना मुंबई बदलत आहे. मुंबई कात टाकत आहे. हे पाहून बाळासाहेब ठाकरे यांनाही आनंद झाला असेल. दरवर्षी मुंबईची तुंबई होते अशा बातम्या बघायला मिळतात ते बदलायचे आहे. पावसात मुंबई खड्ड्यात गेली अस वाचण्याची पाहण्याची सर्वांना सवय झाली आहे. त्यात बदल घडवून येत्या दोन वर्षात खड्डे मुक्त मुंबई करणार आहोत. त्यामुळे खड्डा शोधायला बक्षीस लावायला लागेल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महापालिका जिंकायची आहे : २५ वर्षे तुम्ही कामे न केल्याने पालिकेचा पैसा बँकेत जमवला. त्यावेळी तुम्ही कामे का केली नाहीत असा प्रश्न उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता उपस्थित केला. आता सर्व बदलणार आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च झाला पाहिजे असे आदेश पालिका आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा पैसा खर्च करणार म्हणून अनेकांना पोट दुःखी सुरू झाली आहे. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला आहे. त्यात त्यांच्यावर उपचार करावे. आता कशी केंद्रांची मदत मिळते असे प्रश्न विचारले जात होते.
शिव धनुष्य आपल्याकडे : तुम्ही कधी मागितले का. नेहमी टीका करत राहिलात. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन जे मिळेल ते घेवून येतो, असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. लोकशाहीत मेजोरीटीला महत्त्व असते. म्हणून शिव धनुष्य आपल्याकडे आला आहे. आमचा नेम अचूक असतो, हे सात महिन्यांपूर्वी पाहिले आहे. आम्ही दिवस रात्र काम करत आहोत महापालिका आम्हाला जिंकायची आहे. तुम्ही आरोप करा आम्ही कामाने उत्तर देवू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दोन वर्षं घरात बसून : मुंबई पालिका श्रीमंत पालिका आहे. पालिकेचे पैसे बँकेमध्ये गुंतवून व्याज कमावण्यासाठी नाहीत तर ते जनतेच्या कल्याणासाठी उपयोगी झाले पाहिजेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावरच्या खड्ड्यांची चर्चा होते. खड्ड्यांवर सर्वाधिक मिम तयार होतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एकाच रस्त्यावर खर्च करायचे, जनतेला खड्ड्यात टाकायचे ही नीती आम्ही बदलली आहे. रस्ता झाला की ५० वर्षे खड्डे नाहीत अशी कामे करत आहोत. दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
२५ वर्षात कामे का झाली नाही : दोन वर्षात इतके काम होते मग २५ वर्षात कामे का झाली नाही हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. ते कामे आमच्या काळात झाले म्हणतात. अडीच वर्षात दोन वर्षे दरवाजाच्या आत होते. सहा महिन्यात त्यांनी कामे कशी केली असा प्रश्न उपस्थित करत तुमच्या काळात काहीच झाले नाही म्हणून आम्हाला करायला लागत आहे. आमचे काम पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. काम पूर्ण केल्यानंतर आम्ही करून दाखवले हे बोलून दाखवू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.