नागपूर : देशाच्या मध्यस्थी वसलेला विदर्भ प्रदेश तसा कधीकाळी काँग्रेसचा गड राहिला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या शिलेदारांनी विदर्भात भाजप पक्ष घराघरात पोहचवण्यासाठी घेतलेले परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळेच आज विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून उदयास आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातुमचं जातो त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी विदर्भावर राजकीय प्रेम व्यक्त केलं. मात्र, विदर्भाने मात्र सुरुवातीला काँग्रेस नंतर आता भाजपला पसंती दिल्याने इतर राजकीय पक्षांची विदर्भात जमीनचं तयार होऊ शकली नाही.
संघाचे पाठबळ मात्र जनतेची पाठ : भारतीय जनता पक्षाच्या मागे कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाडबळ राहिलेले आहे. मात्र तरी देखील अनेक दशके भाजप काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फारसी यशस्वी होऊ शकली नव्हती. 2014 साली आलेल्या नरेंद्र मोदी लाटेत भाजपला यशाचे गणित उमगू लागले. त्यानंतर सुरू झालेला प्रवास स्थानिक स्वराज्य संस्थांसह, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री पर्यत पोहचला आहे.
मुठभर लोकांचा पक्ष ते जनतेचा पक्ष : भारतीय जनता पक्ष केवळ ब्राम्हणांचा पक्ष हा समज जनसामान्यांमध्ये होता. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय, दलित, आदिवासी इतर मागासवर्गीय समाज हा भाजप पक्षा पासून कायम दुरावलेल्या असायचा. ९०च्या दशकात त्यावेळी भाजपचे तारणहार ठरलेले लालकृष्ण अडवणींच्या नेतृत्वाखाली गुजरात ते अयोध्या रथयात्रा निघाली. त्याचा थेट परिणाम विदर्भात सुध्दा दिसू लागला होता. हिंदुत्ववाच्या लाटेवर भारतीय जनता पक्ष स्वार झाल्यामुळे विदर्भात एकप्रकारे भाजपसाठी जमीन तयार होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर बाबरी मशीद पडण्यात आल्यामुळे विदर्भात भाजपला हिंदूसाठी लढणार पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती. तेव्हा सुरू झालेला हा प्रवास समृद्ध भाजप इथपर्यंत येऊन पोहचला आहे.
एक-एक कार्यकर्त्यांची मूठ बांधली : ७०,८० च्या दशकात संपूर्ण भारतात काँग्रेसची लाट होती. अशावेळी भारतीय जनता पक्षात काम करण्यासाठी कुणीही तयार होत नसे. विदर्भात पक्षाकडे नेतृत्व करण्यासाठी देखील तयार नेता नव्हता. कार्यकर्त्यांची फोज उभी करण्यासाठी त्यावेळेच्या अनेक नेत्यांनी कष्ट उपसले. त्यामुळेचं भाजपमध्ये त्यावेळी गंगाधर फडणवीस, पंडित बछराज व्यास, प्रभाकरराव दटके, एकनाथ जोग,विनोद गुडघे, महादेवराव शिवणकर यांच्यासारख्या नेत्यांची फळी तयार झाली. त्यानंतरच्या काळात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्यांनी विदर्भातील गावागावात भाजप पोचवण्याचे काम केले आहे. या नेत्यांनी अहोरात्र पक्षाचे काम करत अक्षरशः रक्ताचं पाणी करत पक्ष संघटना मजबूत केली.
भाजपच्या जडणघडणीचे गडकरी साक्षीदार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विदर्भातचं नाही तर महाराष्ट्रसह देशात सर्वमान्य नेतृत्व आहे. नितीन गडकरींनी पक्षाची जडणघडण फारचं जवळून बघितली आहे. पक्षाची बांधणी ते केंद्रीय मंत्री पदाचा प्रवास त्यांनी केला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी गल्ली बोळ्यात पोस्टर चिपकवण्याचे काम करत आयुष्यभर पक्षाची पालखी वाहिली आहे. त्यामुळेच आज भारतीय जनता पक्षाने विदर्भात आपले स्थान मजबूत केले आहे.
फडणवीस शांत,संयमी,कणखर नेतृत्व : केवळ विदर्भ नाही तर, आता संपूर्ण महाराष्ट्र भाजप केवळ एका नावाभोवती केंद्रित झाले आहे. ते म्हणजे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. शांत, संयमी, कणखर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला विदर्भातील तळागाळात पोहचण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे.