नागपूर: चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे माझ्या नशिबी शाररिक दिव्यांगत्व आले असले, तरी उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या स्वप्नांनी मला कधीही स्वस्थ बसू दिलेचं नाही. उडण्याची प्रेरणाचं दिली म्हणूनच आज मी यशस्वी उद्योजक होऊ शकलो आहे. या भावना व्यक्त केल्या आहेत. नागपूरचे दिव्यांग उद्योजक जयसिंग चव्हाण यांनी त्यांना केंद्र सरकारच्या सामाजिक आणि न्याय विभागाकडून देशातील सर्वश्रेष्ठ दिव्यांग हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिना निमित्ताने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
जयसिंग चव्हाण यांना बालपणात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे नशिबी अपंगत्व आले. मात्र त्याचा बाऊ न करता त्यांनी प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया साधली आहे, म्हणून आज ते हजारो लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सुरवातीला सबाणांची विक्री : जयसिंग चव्हाण यांना दोन्ही पाय नसताना सुद्धा काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि धडपड स्वस्थ बसू देत नव्हती. सुरुवातीला त्यांनी घरोघरी जाऊन साबण विकण्याचे काम सुरू केले. इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज कोट्यवधी उलाढाल असलेला उद्योग म्हणून नावारूपाला आला आहे. आज त्यांची गणना नागपुरातील यशस्वी उद्योजक म्हणून केली जाते. राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्ताने आम्ही त्यांचा संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आपणही काम करू शकतो ही उर्मी: नागपुरचे जयसिंग चव्हाण यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणी पोलिओची चुकीची लस दिली गेल्यामुळे जयसिंग यांना विविध शारीरिक व्याधी झाल्या. हळूहळू या व्याधींवर मात करत ते आज एक उत्तम उद्योजक म्हणून कार्य करत आहेत. त्यांना त्यांच्या कार्यासाठी शासनाकडून विविध पुरस्कार देखील गौरविण्यात आले आहे. लहानपणी देण्यात आलेल्या एका चुकीच्या डोसमुळे जयसिंग चव्हाण यांच्या हात, पाय व डोक्याला शारीरिक व्याधी जडल्या. त्यामुळे ते पूर्णतः अस्वस्थ झाले. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले जयसिंग हे नागपुरातील एका छोट्याशा चाळीत राहायचे. शारीरिक कमकुवततेमुळे ते इतरत्र जात नव्हते. हळुहळू त्यांनी मनाशी निश्चय करत वयाच्या १८ व्या वर्षी आपणही काम करू शकतो. या उर्मीतून व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी साबण विकायला सुरूवात केली.
ईच्छा तेथे मार्ग: 'इच्छा तेथे मार्ग' हा वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. एखाद्याला नवी उमेद द्यायची असेल तर, या वाक्प्रचाराचा उपयोग केला जातो. यालाच प्रत्यक्षात उतरवत आपल्या शारीरिक व्याधीतही यशाची पायरी चढत जयसिंग चव्हाण यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. कधीकाळी पोट भरण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारण्याची त्यांनी तयारी असायची. मात्र, शरीराने दिव्यांग असल्यामुळे त्यांना काम मिळणे, देखील कठीण झाले होते. मात्र या व्याधीला आपल्या जीवनाची दुर्बलता न बनू देता शस्त्र मानून जयसिंग चव्हाण यांनी कोट्यधीश होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे.
पुन्हा जिद्दीने भरारी: दिव्यांगांना मिळणाऱ्या सायकलचा वापर करत ते घरोघरी जाऊन व्यवसाय करू लागले. परंतु, किती दिवस घरोघरी जाऊन व्यवसाय करायचा. या प्रश्नातून त्यांनी वाट काढत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. छोटेखानी उद्योगाला सुरुवात केली. शारीरिक शक्ती नसतानाही डोक्याचा वापर करत उद्योगाला उभारी देण्याचे काम चव्हाण यांनी केले. त्यानंतर स्वतःकडे लक्ष देत त्यांनी हात आणि डोक्याच्या व्याधीवर मात करत पहिला विजय मिळविला. मात्र या काळात व्यवसाय देखील सुरूच होता. परंतु फारसे यश मिळत नव्हते. अशातच २०१० साली त्यांच्या कंपनीला आग लागली. त्यात सर्व जळाले. जयसिंग यांना निराशा वाटू लागली. परंतु आगीनंतर सकारात्मकेची धग स्वतःत निर्माण करत त्यांनी घरच्यांच्या मदतीने पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. नंतर व्यवसाय उभारी घेऊ लागला.
दिव्यांग असूनही उत्तम उद्योजक: शारीरिक समाधान नसले तरी मनाला मात्र प्रचंड आनंद होत होता. या सगळ्या काळात जयसिंग यांनी उद्योग क्षेत्रातील लहान- सहान बाबींचा कसून अभ्यास केला. आणि याच अभ्यास व दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर जयसिंग यांनी दिव्यांग असूनही एक उत्तम उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला. आज जयसिंग यांच्याकडे विविध उद्योग आहेत. ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. तसेच साबणाचा कारखाना, बुटीबोरी एमआयडीसी येथे ऑइल रिफायनरी फॅक्टरी, रेस्टॉरंटला वस्तू पुरवठा, स्मॉल स्केल इंडस्ट्रियल सप्लाय हेही व्यवसाय ते करतात. आज अनेकांना उद्योगाबाबत मार्गदर्शन करतात. हे सगळं घडलय त्यांच्यात असलेल्या आत्मविश्वास व विचारशील कृतीमुळे. त्यामुळे अनेक दिव्यांगासाठी जयसिंग व त्यांचे कार्य हे नवा आत्मविश्वास देणारे ठरत आहे. शिवाय दिव्यांगांनी फक्त शासनाच्या योजनेवर अवलंबून न राहता. आपल्या कर्तृत्वशक्ती चालना देऊन स्वतःला घडवावे असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.