नागपूर : जिल्ह्यात फार्मसीतून रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रिला बंदी घालण्यात आली आहे. इंजेक्शनचा अनियंत्रीत वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे आल्या. यानंतर त्यांनी हा निर्णय घेत याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हे इंजेक्शन केवळ कोरोना रुग्णालय किंवा रुग्णालयातील फार्मसीला स्टॉकिस्टकडून पुरवठा होणार आहे.
नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर या इंजेक्शनचा वापर अनियंत्रितपणे होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यामुळे भविष्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आता फार्मसीतून रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रिला बंदी घालण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री अव्वाच्या सव्वा दराने केली जात असल्याच्या देखील अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे गरजू रुग्णांना हे इंजेक्शन सहजतेने उपलब्ध होईल.
रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर असणार देखरेख
रेमडेसिवीरचा वापर अनियंत्रितपणे होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी फार्मसीमधून हे इंजेक्शन विक्री करण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र, या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी पुरवठादारांवर देखरेख असणार आहे. पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पुष्पहार बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'मराठा संघटनांकडून मला धमकीचे कॉल्स येत आहेत'
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार - गृहमंत्री वळसे पाटील