नागपूर - पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, आज(शुक्रवार) नागपुरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. याच रॅलीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे विरोध’ हा दरवर्षीचा कार्यक्रमही उरकून घेण्याचा प्रताप केला आहे.
दरवर्षी 'व्हॅलेन्टाईन डे'चा निषेध बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. मात्र, यावर्षी सरळ निषेध न करता पुलवामा हल्ल्यातील वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमासह 'व्हॅलेन्टाईन डे'चा निषेधही उरकून घेतला आहे.
तेलंगखेडी हनूमान मंदिर परिसर ते फुटाळा चौपाटीपर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. यात पुलवामा आतंकवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर, त्याच रॅलीत ‘व्हॅलेंटाईन डे विरोध' करत, व्हॅलेंटाईन डे चे ग्रिटींग कार्ड, टेडी बियर, हार्ट पिलो इत्यादी साहित्य जाळण्यात आले. या दोन्ही गोष्टींचा एकत्र समावेश करणे शहरातील नागरिकांना रुचल्या नसल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
हेही वाचा - सिंचन घोटाळा प्रकरण : सीबीआय आणि ईडीला प्रतिवादी करण्याची मागणी नागपूर खंडपीठाने फेटाळली
हेही वाचा - पुण्यानंतर आता नागपुरात गाड्या फोडण्याचे लोण, दुचाकी अन् रिक्षांचे लाखोंचे नुकसान