नागपूर - संपूर्ण राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम असताना नागपुरात सुपर संडेला कोणत्याही राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यांची एकही जाहीर सभा नाही. त्यामुळे उमेदवारांनी पदयात्रा आणि मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिल्याचे नागपुरात पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात येणार रविवार म्हणजे उमेदवारांसाठी सर्वात महत्वाचा दिवस असतो. रविवारी सर्व मतदार एकाच वेळी घरी उपलब्ध असल्याने सकाळी-सकाळी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या भेटीगाठी घेण्याची सुवर्ण संधी म्हणून रविवारकडे बघितले जाते. त्यानंतर आज रविवारचे औचित्य साधूनच संध्याकाळी ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध मतदारसंघामध्ये जाहीर सभांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' टीकेला आशिष देशमुखांचे प्रत्युत्तर
नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर म्हणून परिचित आहे. शिवाय, संघाचे मुख्यालयात सुद्धा नागपुरात असल्याने नागपूर आपल्याच बाजूने आहे, असा समज करून भाजपने नागपूरकरांना गृहीत धरले असावे. तसे बघितल्यास आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने सगळ्याच पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते रस्त्यावर दिसून आले. ज्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंग चढला आहे. युतीचे, आघाडीचे आणि अपक्ष उमेदवार प्रचाराच्या रणधुमाळीत गुंतलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात सुद्धा आज प्रचाराचा मोठा जोर आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहे. कोणी पदयात्रा काढत मतदारांपर्यंत पोहोचत आहे. तर कोणी रॅली काढून पोहोचत आहे. रस्ते प्रचार रॅलीने रंगी-बेरंगी झाले असताना शहरात रविवारी एकही मोठ्या नेत्यांची सभा नसल्याने नागपूरकरांची संध्याकाळ मात्र काहीशी निरस झाली आहे.
हेही वाचा - खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम - थोरात