नागपूर - कोरोना काळात राज्यातील आशा सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करत आहे. मात्र, शासनाकडून या कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. त्यामुळे., संतापलेल्या आशा सेविकांनी आज संविधान चौकात चेतावणी आंदोलन केले. यात दिवसाचे मानधन नव्हे, तर वेतनाची मागणी करण्यात आली. तसेच, राज्य शासनाने विमा कवचही लागू करावे. अशी मागणीही करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
कोरोना योद्धा म्हणून आम्हीही सेवा देत आहोत. परंतु, आम्हाला कोणतेही संरक्षण नाही, वेतन नाही. शिवाय या बाबींसाठी वारंवार आंदोलन करूनही शासन आमची दखल घेत नाही. त्यामुळे, शासनाने आशा सेविकांना वेतन लागू करावे. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्यांना विविध सुविधा दिल्या जात आहे. मात्र, आशा सेविकांना कोणतीही सुविधा नसून उलट मजुरा प्रमाणे मानधन दिले जाते. शिवाय, कोरोना सर्वेक्षण करताना कोणतीही आरोग्यविषयक बाबींची पूर्तता शासन करत नाही. त्यामुळे, शासनाने या बाबींची दखल घेत आशा सेविकांना विमा कवचही लागू करावे. अशी मागणी आंदोलकर्त्यांनी केली.
तसेच, २०१९ पासून लागू करण्यात आलेले मानधन अजून प्राप्त झाले नाही. त्याचबरोबर, कोरोना सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविकांवर वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे, याची दखल शासन कधी घेणार? असा सवालही आंदोलनकर्त्यांनी केला. त्याचबरोबर, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजनेसाठी आशा सेविकांना देण्यात आलेले साहित्य बोगस असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे आशांना स्वतःकडून पैसे भरून सर्वेक्षण करावे लागत आहे. त्यामुळे, या सर्व बाबींची शासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही, तर यापुढे काम बंद आंदोलन करू, असा इशारा आशा सेविकांनी दिला.
हेही वाचा- बाल्या बिनेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या