नागपूर - गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाच्या १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे जवानांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात अनेक पोलीस ठाणे प्रस्तावित असून त्याकडे वरिष्ठांचे लक्ष नसल्याचा गंभीर आरोप नक्षलग्रस्त भागात काम करणारे नक्षल विरोधी भूमकाल संगठनेचे अध्यक्ष अरविंद सोवनी यांनी केला आहे.
सोवनी म्हणाले, नक्षल समस्या ही जुनी आहे. आपल्या जवानांनी ४० नक्षलवादी मारले होते. त्यामुळे नक्षलवादी त्याचा बदला घेण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांनी आतापर्यंत हिंमत केली नव्हती. त्यामुळे आज जी घटना घडली ती दुःखद आहे. सी-६० च्या जवानांची सीमा ही ७० ते ८० किमीपर्यंत आहे. त्यांना तेवढा प्रवास करावा लागतो. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी काही पोलीस ठाणे प्रस्तावित आहेत. मात्र अद्यापपर्यंत ती झालेली नाहीत. पोलीस ठाणे जर झाली असती तर त्यांचा प्रवास कमी झाला असता. परंतु याकडे वरिष्ठ लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कोणत्याही कारवाईत यश मिळाले तर त्याचे श्रेय वरिष्ठ घेतात. मात्र, अपयश आले तर त्याची जबाबदारी वरिष्ट घेणार का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.