नागपूर - विदर्भासाठी दिलासादायक बातमी आहे. साधारणतः १५ जूननंतर दाखल होणारा मान्सून यंदा तब्बल आठ दिवस आधीच विदर्भात दाखल झाला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 11 ते 13 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा आंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईसह राज्यातील काही भागात मान्सून दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण आणि मुंबईत मानसून दाखल झाल्यानंतर आठवडाभराने मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. मात्र यंदा मान्सूनची गती चांगली असल्यामुळे तब्बल आठ दिवसांपूर्वीच मान्सून विदर्भात दाखल झाला आहे. मान्सून विदर्भात दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
अतिवृष्टीचा इशारा
११ ते १३ जूनदरम्यान नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. शाहू यांनी म्हटले आहे. दरम्यान यावर्षी विदर्भात 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा - Mumbai Rains ..त्यामुळे काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, महापालिका आयुक्तांची स्पष्टोक्ती