नागपूर - राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज ईडीतर्फे छापेमारी करण्यात आली. सकाळी 8 वाजेच्या सुमारास ईडीचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झाले होते. ही चौकशी सुमारे नऊ तास चालली. या पथकामध्ये एक महिला अधिकारीसह पाच जणांचा समावेश होता. यावेळी सीआरपीएफची महिला बटालियन ही तैनात करण्यात आली होती.
ईडीच्या पथकामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश -
आज दिवसभर चाललेल्या चौकशीत अनिल देशमुख यांची पत्नी, मुलगा सलील आणि त्यांची सून या सर्वांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली. यात अनेक छोट्या छोट्या बाबीदेखील तपासण्यात आल्या असल्याची माहिती पुढे येत आहे. महिलांचीही चौकशी होत असल्याने ईडीच्या पथकामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या 9 तासांत तपासणीत घरातील अलमारी तपासली गेली. त्यानंतर कुटुंबातील तीनही सदस्याचे स्टेटमेंट नोंदवण्यात आले. दरम्यान, देशमुख यांच्याशी संबंध असलेले व्यावसायिक, दोन सीए, कोळसा व्यापारी आणि बिल्डर यांची देखील चौकशी करण्यात आली होती. तसेच नागपूरमध्ये 16 जून आणि 25 मे रोजी ईडीने वेगवेगळ्या ठिकाणीदेखील कारवाई केली होती.
काय आहे प्रकरण -
मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरण या दोन्ही प्रकरणानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. बदलीच्या नाराजीमुळे परमबीर सिंह यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि रेस्टॉरंटमधून शंभर कोटी रुपयाच्या वसूलीचे टार्गेट दिले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मुंबई हायकोर्टाकडे पाठवली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी असे निर्देश दिले होते.
हेही वाचा - 'या' आरोपांच्या पुराव्यांसाठी देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे...