नागपूर : राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूरातील काटोल आणि नरखेड तालुक्याला देखील अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन तो अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.
शेतकऱ्यांचे नुकसान : अनिल देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक मातीमोल झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची आहे. या गारपीट, अवकाळी पावसाने कापनीला आलेल्या गहु, हरबऱ्यासोबत भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच संत्रा व मोसंबीचे व अन्य फळ पिकांचे सुध्दा यात नुकसान झाल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
सराकारकडून मदत नाहीच : सतत होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी आधीच आर्थिक टंचाईत आहेत. तसेच आठ महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातील संत्रा व मोसंबीचे नुकसान होऊनही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप देखील देशमुखांनी केला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना तातडीने मदत देण्याची मागणी आमदार अनिल देशमुख यांनी सातत्याने मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. अधिवेशन संपण्यापूर्वी मदतीची घोषणा राज्य सरकारने करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे नागपूर, नविदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. याकरिता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
बावनकुळेंचे विरोधकांवर टीकस्त्र : बावनकुळे पुढे म्हणाले की, विरोधक संपाला पाठिंबा देत आहेत आणि तेच विरोधक पंचनामे तात्काळ करा असा आग्रह धरत आहे. 2005 साली पेंशन योजना बंद झाली, तेव्हा जयंत पाटील त्यावेळी अर्थमंत्री होते. त्यावेळी पेंशन योजना बंद का करावी लागली याचे अनेक भाषणात उल्लेख केला आहे. आज तीच पेंशन योजना सुरू करा, यासाठी संपाला पाठिंबा देत आहेत. विरोधकांनी आधी आपला चेहरा आरशात बघितला पाहिजे. विरोधकांनी दुटप्पी भूमिका असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.