नागपूर - नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, हे कॉंग्रेसला दिसत नाही. केंद्रसरकारचे कायदे शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणारे आहेत. तरीही काँग्रेस बेशरमा सारखे आंदोलन करून नौटंकी करत असल्याचा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला. ते नागपूरात राज भवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते. राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी विदर्भावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा राज्यपालांना वाचून दाखवला.
कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे -
विदर्भातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही, ते काँग्रेसला दिसत नाही. बोंड अळी, बोंडसड झालेली काँग्रेसला दिसत नाही. फक्त 400 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. केंद्र सरकारचे कायदे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारे आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फासातून बाहेर काढणारे आहेत. तरीही काँग्रेस कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे, असे आरोप अनिल बोंडे यांनी केले.
हे सरकार आंधळ-मुके-बहिरे आहे -
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विदर्भाला दिलेली मदत मात्र, तुटपुंजी आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने विदर्भातील शेतकऱ्यावर सतत अन्याय होत आहे. हे सरकार आंधळे मुके बहिरे आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी दिसत नाहीत. कृषीमंत्र्यांना सांगितले तर कृषीमंत्री ऐकायला तयार नाही. मुख्यमंत्री येथे आले तर तेही ऐकायला तयार नाही. शेवटी आम्हाला राज्यपालांचा सहारा घ्यावा लागला, असल्याचे अनिल बोंडे म्हणाले.
राज्यपालांनी दिले मदतीचे आश्वासन -
शेतकऱ्यानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भ, अमरावती आणि नागपूर विभागाला मिळून शासनाने 252 कोटी रुपये देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. विदर्भावर अन्याय झाला याबाबत राज्यपालांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.