नागपूर - कस्तुरचंद पार्क मैदानावर सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत नाली बनवण्याचे काम महानगरपालिकेतर्फे सुरू आहे. या कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. खोदकामादरम्यान पुन्हा पुरातन तोफा आढळल्या आहेत. मागील महिन्यातही अश्याच प्रकारच्या तोफा कस्तुरचंद पार्क येथे सापडल्या होत्या.
सुमारे दहा फूट लांबीच्या या तोफा आहेत. पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार या तोफांची बांधणी श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांनी केली होती. भोसले यांनी १८१२-१३ या कालावधी दरम्यान सक्करदरा तलाव परिसरात तोफा बनवण्याचा कारखाना तयार केला होता. तिथे चाळीस शेर वजनाचा गोळा फेकण्याची क्षमता असणाऱ्या तोफा तयार होत असत.
हेही वाचा - सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे निमंत्रण नाही
कस्तुरचंद पार्कच्या खोदकामात मिळालेल्या तोफांची लांबी आणि रचना पाहता त्या भोसलेकालीन असल्याचे दिसते. ब्रिटिश काळात या तोफा कस्तुरचंद पार्कच्या जागी गाडल्या गेल्या असाव्यात, असा अंदाज आहे. सापडलेल्या सर्व तोफा पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे अभियंता किशोर माथोर यांनी दिली.