नागपूर - विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज सताधाऱ्यांवर चांगलीच फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही नाव न घेता निषाणा साधला. तसेच ज्यासाठी हे अधिवेशन होते, त्या अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यासंदर्भातील गैरशिस्तीवरही पवारांनी बोट ठेवले. विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री विधानभवनात नाहीत. शासन आणि मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे उल्हासनगरच्या नागरिकांना पाण्याची समस्या आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आज सभागृहात बोलत होते. ते म्हणाले, प्रश्नोत्तराचा दुसरा आठवडा आहे, मुख्यमंत्र्यांकडे १५ खाते आहेत. उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खाते आहेत. सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपस्थित असले तर प्रशासनावर दबाव राहतो. मुख्यमंत्र्यांकडून व्यापर उत्तर येऊ शकतात, असेही यावेळी अजित पवार म्हणाले. यावर फडणवीस म्हणाले, तुम्ही सभागृह चालू देणार हे माहीत नव्हते, नाहीतर मुख्यमंत्री आले असते. यावर अजितदादा म्हणाले, आपण कसे आलात? असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
महिला मंत्री नसल्याच्या मुद्द्यावरही लक्ष वेधले - राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरले. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक महत्वाची कामे रखडून पडलेली असल्याचे सरकारला निदर्शनास आणून देताना सध्याच्या मंत्र्यांकडून तातडीने निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप केला. अजित पवार यांनी यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याच्या मुद्द्यावरही लक्ष वेधले. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
उध्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा - आता सरकार येऊन सहा महिने लोटले तरी अनेक खात्यांना मंत्री यांना मिळेनात. अनेक कामे रखडली आहेत. आता कुणी कितीही गप्पा केल्या तरी भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस हेच सर्वात ताकदवान नेते आहेत. कोणत्याही मंत्र्याला काही काम सांगितले की फडणवीसांना विचारुन सांगतो असे उत्तर मिळते. सध्या सरकारची अशी अवस्था झाली आहे की मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही अशी नामुष्की यांच्यावर ओढावली आहे. सरकारला एक महिला मंत्री नेमता येत नाही हा तर महिलांचा अपमान आहे. मी आता तर अमृता वहिनींनाच फोन करुन सांगणार आहे की यांच्याकडे बघा जरा", असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला. तसेच, काहीतरी करा रात्रीच्या रात्री दिल्लीला फोन लावा आणि उध्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असा चिमटाही अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी काढला.
मीच करेक्ट कार्यक्रम करेन - अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना यावेळी बारामती विधानसभा मतदार संघात येऊन केल्या जाणाऱ्या विधानांवरुनही लक्ष्य केले. बारामतीत येऊन काहीजण करेक्ट कार्यक्रम करण्याच्या वल्गना करतात. पण मी एक सांगतो जर मी मनात आणले तर जे वल्गना करत आहेत त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
दोष नसताना तुरुंगात टाकता, मोगलाई आहे का? - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका झाल्याच्या मुद्द्यावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दोष नसतानाही तपास संस्थांकडून नेत्यांना तुरुंगात टाकले जाते. काहीच सिद्ध होत नसताना तुरुंगात जाणे किती योग्य आहे? दोष नसताना तुरुंगांत टाकता ही काय मोगलाई आहे का?, असा सवाल करत अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.