नागपूर - एका पराभवाने पंकजा आणि एकनाथ खडसे सैरभैर झाले आहेत. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे अहंकारी आहेत. अहंकारीपणामुळे आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करता येत नाही, असे म्हणत संघ विचारांच्या तरुण भारत या वृत्तपत्रातून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वावर निशाणा साधला होता. पक्षातून आपल्याला बेदखल केले जात असल्याचे वक्तव्य दोघांनीही केले होते. त्यांच्या या टिकेवर आज तरुण भारतने पलटवार केला आहे. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी केलेले भाषण अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
नाथाभाऊ पक्ष सोडण्याच्या तयारीत
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचेही तरुण भारतमधून म्हटले आहे. कारण त्यांनी गोपीनाथ गडावर केलेल्या भाषणातून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाने माझ्यावर भरोसा करु नये, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. तसेच आम्हाला पक्षातून तुम्ही जा अशी परिस्थिती निर्माण केल्याचे खडसे म्हणाले. तर पंकजा मुंडेंनीही पक्ष सोडण्याचे मन बनवल्याचे तरुण भारतने म्हटले आहे.
काळाची पाऊले ओळखली नाहीत म्हणून ही आवस्था
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी काळाची पाऊले ओळखली नाहीत, म्हणूनच त्यांची ही अवस्था झाल्याचेही तरुण भारतमधून म्हटले आहे. मतदारांच्या अपेक्षा, मानसिकता बदलत चालल्या आहेत. याची जाण दोघांनाही नाही. गेल्या ५ वर्षातील आपले बोलणे, वागणे, कार्यकर्त्यांशी संवाद हे कसे होते हे त्यांनी पाहणे गरजेचे असल्याचे तरुण भारतने म्हटले आहे.