नागपूर- गाईच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये, तर दुधाच्या भुकटीला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्या, या मागणीसाठी नागपुरात भाजपकडून विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. तसेच सरकारकडून ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास १ आॅगस्टला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
दूध व्यावसायिकांच्या मुद्यावरुन भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दुधाला प्रति लिटर १० रुपये तर दुधाच्या भुकटीला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्या, शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानाचे पैसै थेट त्यांच्या बँकेत जमा झाले पाहिजे अशी मागणी भाजपने केली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुधाचे वाढीव अनुदान दिले होते. मात्र आताच्या सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांना शेतकऱ्यांची पर्वा नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन दुधाला अनुदान द्यावे. अन्यथा १ आॅगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात व विदर्भातील दूध संकलन केंद्रासमोर आंदोलन करुन दूध संकलन केंद्र बंद पाडणार असल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला.
सरकारने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या मुद्यावरुन देखील विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यात ज्या ग्रामपंचायतीची मुतद संपलेले आहे अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमता सरपंचांना ६ महिने मुदत वाढ द्यावी, असेही बागनकुळे यांनी निवेदनात म्हटले आहे.