नागपूर - सिंचन घोटाळ्याप्रकरणी देण्यात आलेली माहिती आणि जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे, ते मान्य नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवनाबाहेर माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली.
सिंचन गैरव्यवहार कसा झाला, या संदर्भात विस्तारित शपथपत्र 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)च्या महासंचालकांनी सादर केलेले आहे. आत्ता एसीबीने सादर केलेले प्रतिज्ञापत्र असे म्हणते की, 2018 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद बाबींच्या संदर्भात योग्य कागदपत्रे उपलब्ध नाहीत. मात्र, त्या बाबी बरोबर नाहीत हे सांगणारा एकही पुरावा यामध्ये नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सिंचनाच्या विभागाच्या फाईल्सवर मंत्र्यांनी केलेली सही आहे. तरीही याला मंत्र्यांना जबाबदार न ठरवता अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार ठरवले जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र चुकीचे असून, त्याला आमचा विरोध आहे. मागील महिन्यात 27 तारखेला दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे सारच होते आणि आजचेही सारच आहे. सरकारच्या सोयीचे अर्थ लावले जात आहेत. हे सर्व षडयंत्र रचले जात असल्याचे फडणवीस म्हणाले.
जाणीवपूर्वक घोटाळ्याला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न चालवले जात आहे. या प्रकरणासंदर्भात भविष्यात हस्तक्षेप याचिका(इंटरवेंशन) देखील उच्च न्यायालयात करू, असे फडणवीस म्हणाले. सरकार पूर्णपणे कार्यरत नसताना कनिष्ठ अधिकाऱयांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. आता सरकार पूर्णपणे कार्यरत असताना वरिष्ठ अधिकारीही तेच प्रतिज्ञापत्र सादर करत आहेत, या संदर्भात सरकारने स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.