नागपूर - कोरोना विषाणूंचा संसर्ग तपासण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन, धक्काबुक्की झाल्याचे अनेक प्रसंग देशभरात समोर आले आहेत. नागपुरातही सर्वेक्षणासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा असाच एक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल रफिक (वय ६०) या व्यक्तीस अटक केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महापालिकेतर्फे शहरात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात येत आहे. महापालिकेची चमू तहसील पोलीस ठाणे अंतर्गतच्या मोमीनपुरा भागातील कब्रस्तान परिसरात सर्वेक्षण करत होते. दरम्यान, दोन व्यक्तींनी सीएए व एनपीआर विषयी हे कर्मचारी माहिती गोळा करत असल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
या घटनेची माहिती महापालिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिल्यावर त्या दोन व्यक्तींवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तर, ६० वर्षीय अब्दुल रफिक या आरोपीस अटक केली. यानंतर, कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी संवेदनशील परिसरात जाताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस पथकाला सोबत न्यावे अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहे.