नागपूर - गुंगीचे औषध देऊन एका 50 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर तब्बल 3 वर्षे बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडिता एका मजुराची मुलगी असल्याने नराधमाने त्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन हे किळसवाणे कृत्य केल्याची माहिती आहे. या प्रकरणात पीडित मुलीची आईदेखील आरोपीला सहकार्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मध्यप्रदेशच्या शिवणी येथील एक दाम्पत्य 2 तरुण मुलींना घेऊन कामाच्या शोधात 4 वर्षांपूर्वी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांची ओळख अशोक जैस्वाल नामक शाळा संचालकासोबत झाली. जैस्वालने त्यांना वाठोड्यातील शेतावर काम दिले. त्याच शेतावर जैस्वाल यांचे फार्महाऊस असल्याने ते मजूर कुटुंब तिथेच राहत होते. दरम्यान, आरोपीची नजर शेत मजुराच्या पत्नीवर गेली, त्यामुळे त्याने रोज शेतावर जायला सुरुवात केली. कामावरून काढण्याची धमकी देऊन आरोपीने शेतमजुराच्या पत्नीला आपल्या जाळ्यात ओढले. नराधम तेवढ्यावरच थांबला नाही त्यानंतर त्याची वाईट नजर त्या महिलेच्या मोठ्या मुलीवर गेली, त्याने मुलीशी शारीरिक संबंधासाठी महिलेवर दबाव टाकायला सुरुवात केली. दरम्यान, आरोपीने शेतमजुराची दुसऱ्या शेतात रवानगी केली होती.
हेही वाचा - 'क्राईम कॅपिटल' नागपूरमध्ये आईसह चिमुरड्याचा बत्त्याने ठेचून खून
पैशाच्या आणि नविन कपड्यांच्या आमिषाला बळी पडून त्या महिलेने स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याची परवानगीच आरोपीला देऊन टाकली. एवढेच काय तर आरोपी त्या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तिची आई पीडित मुलीला गुंगीचे औषध द्यायची. त्यानंतर मुलीला खोलीत पाठवून स्वतः मात्र त्या खोलीबाहेर पहारा देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
हा किळसवाणा प्रकार तब्बल 3 वर्षे सुरू होता. आरोपी जैस्वाल हा वाट्टेल तेव्हा फार्महाऊसवर येऊन त्या मुलीवर बलात्कार करायचा. काही दिवसांपूर्वी त्या पीडित मुलीची अल्पवयीन बहीण एका तरुणासोबत सोबत पळून गेली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याने बालकल्याण समितीने त्या मुलीची चौकशी केली असता तिने जैस्वाल नावाचा व्यक्ती गेल्या 3 वर्षांपासून मोठ्या बहिणीवर बलात्कार करत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी कारवाई करत आरोपी अशोक जैस्वाल विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पीडितेच्या आईवरसुद्धा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - नागपूरमध्ये 'झिरो डिग्री'वर गुन्हे शाखेची कारवाई, मालकाविरोधात गुन्हा दाखल