नागपूर - जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल बाहेर येत आहेत. मात्र, हे निकाल भाजपसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अपेक्षांचा भंग करणारे असल्याचे प्राथमिक चित्र दिसत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी येथून काँग्रेसच्या उमेदवाराने जिल्हा परिषद निवडणूक जिंकली आहे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथून भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का देत काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत.
काँग्रेस | राष्ट्रवादी | भाजप | शिवसेना | अपक्ष | शेकाप |
26 | 12 | 10 | 01 | 01 | 01 |
Live Update -
- 12.46 PM - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख विजयी
नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. तसेच नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व होते. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे चित्र पालटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचा चांगलाच कस लागला आहे. तसेच राज्यातील सत्तांतरामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने देखील चांगलीच मोर्चेबांधणी करीत निवडणूक लढवली. तसेच महाविकास आघाडीचा महत्त्वाचा पक्ष शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली होती.
नागपूर जिल्हा परिषदेत एकूण 58 जागा आहेत. 2013 पासून ही जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात होती. 2013 मध्ये भाजपने शिवसेना आणि बसपच्या मदतीने सत्ता काबीज केली होती. मात्र, यावेळी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे जिल्ह्यात देखील चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढत आहेत.