नागपूर - आज आंतराष्ट्रीय वाघ दिवस आहे. त्यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघाची संख्या असलेला अहवाल सार्वजनिक केला. यामध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघांची वाढलेली संख्या समाधानाची बाब आहे. मात्र, वाघांचे अधिवास असुरक्षित आहेत. त्याकडे कुणाचेही फारसे लक्ष नसल्याचे मत मानद वन्य जीव संरक्षक कुंदन हाते यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या 2014 पासून तर 2019 पर्यंतच्या काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 64 टक्क्यांची वाढ झाली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 312 वाघांचे अधिवास असल्याचे अधोरेखित झाले आहे. राज्य सरकारने हाती घेतलेल्या व्याघ्र संवर्धन मोहिमेचे हे फळ आहे, असे देखील हाते म्हणाले.
आजच्या घडीला देशात 2 हजार 967 वाघ वास्तव्यास आहेत. हे गौरवाची बाब आहे. गेल्या 2014 साली झालेल्या व्याघ्र गणनेनुसार राज्यात 190 वाघांची नोंद झाली होती. त्यानुसार या ५ वर्षात महाराष्ट्रात 64 टक्के वाघ वाढलेले आहेत. याचाच अर्थ राज्यात 122 वाघांची भर पडलेली आहे. देश पातळीवर वाघांचा वाढलेला आकडा 20 टक्के इतका आहे. या सर्व सकारात्मक आकडेवारीमुळे देशात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अजूनही वाघ आणि मानवांच्या संघर्षाचे खेळ संपलेले नाही, असे मत मानद वन्य जीव संरक्षक कुंदन हाते यांनी व्यक्त केले आहे.
वाघांच्या हक्काच्या अधिवासावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यामुळे वन्यजीव गाव आणि शहरांवर आक्रमण करत आहेत. मात्र, हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग काहीही करू शकला नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे मूळ काम करू देण्याऐवजी त्यांना इतर कामांना जुंपले जात असल्याचा आरोप हाते यांनी यावेळी केला.