नागपूर - उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या अतिशय वेगात वाढत आहे. शनिवारी आलेल्यात अहवालात एका दिवसात 54 जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांचा बेफिकीरपणा याला जबाबदार असल्याचे दिसते आहे तर, प्रशासनाच्या उपाया योजना अजूनही कमी पडत आहेत. नागपूर जिल्ह्यात शनिवारी 3 हजार 688 नवीन बाधितांची नोंद झाली. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.
बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या -
नागपुरात मृत्यू तांडव सुरू झाले असून रूग्णांना बेड न मिळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. केवळ 10 ते 15 टक्के लोकांना त्रास होऊन दवाखण्यात दाखल करावे लागत आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर होत चालल्याचे चित्र आहे.
पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांत देखील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. भंडारा जिल्ह्यात शनिवारी 200 रूग्ण आढळले. चंद्रपूर 223, गोंदिया 97, वर्धा 237, गडचिरोलीत 245 बाधित सापडले. तर, 3 हजार 734 जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.