नागपूर - कोरोनाने जिल्ह्यात पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. गेल्या 24 तासात करोनाच्या नव्या 500 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी रुग्णसंख्येत तब्बल 500 रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे लसीकरण मोहीम राबवली जात असताना दुसरीकडे रुग्ण संख्या वाढीस लागल्यामुळे पुन्हा नव्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागपुरात 1 फेब्रुवारीला 218 करोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत जाऊन बाराव्या दिवशी तब्बल 500 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. नागपूर शहरातील 9 परिसर पुन्हा करोना चे हॉटस्पॉट ठरू शकतात, असा अंदाज महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी दिला आहे. खामला, जयताळा, जाफरनगर, दिघोरी, स्वावलंबी नगर, अयोध्यानगर, न्यू बिडी पेठ, वाठोडा, जरीपटका या परिसराचा यात समावेश आहे. या परिसरातून पुन्हा कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. भविष्यात हे परिसर कोरोना हॉटस्पॉट ठरू शकतात, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी दिली.
हेही वाचा - अमरावती विभागात कोरोनाचा कहर; महाविद्यालये सुरू होणार नाहीत
नागरिकांची बेफिकरीमुळे पुन्हा धोका वाढणार -
कोरोनाच्या नियंत्रणासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोना बाबत वाढलेली बेफिकरी, मास्कचा वापर टाळणे, फिजिकल डिस्टन्सिंग न करणे, सॅनिटायजरचा वापर न करणे यामुळे नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 5 डिसेंबरला 527 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 66 दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या 500वर पोहोचली आहे.